10 May 2011

एका असामान्य माणसाची असामान्य कहाणी आणि एका सामान्य माणसाची सामान्य कहाणी..!!


गेल्या आठवड्याच्या अखेरीस दोन मराठी चित्रपट पहायची संधी मिळाली.. म्हणजे, संधी मिळवली खरंतर.. कारण, 'बालगंधर्व' आणि 'ताऱ्यांचे बेट' या दोन्ही चित्रपटांची इतकी चर्चा ऐकली होती.. की रुपेरी पडद्यावर जाऊन पाहण्याचा मोह आवरला नाही.. मराठी सिनेमा कात टाकतोय, ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.. गेल्या १-२ वर्षांपासून मराठीत कितीतरी वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. आतापर्यंत जोगवा, नटरंग, गाभ्रीचा पाऊस, हरिश्चंद्राची factory, मी सिंधुताई सपकाळ, हे आणि अशा प्रकारचे अनेक चित्रपट आले.. त्यातील प्रत्येकाने इतिहासातील किंवा वर्तमान सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.. आजचा मराठी चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता, एक सामाजिक प्रबोधनाचे साधन बनू पाहतो आहे.. आणि त्याचं समाजात स्वागत होत आहे, हे निश्चितपणे सामाजिक प्रगतीचं द्योतक आहे.. 

'बालगंधर्व' चित्रपट येण्यापूर्वीच त्याबद्दलची चर्चा सुरु झाली होती.. सुबोध भावेने बालगंधर्व साकारण्यासाठी घेतलेल्या अथक मेहेनतीची जेवढी चर्चा झाली, तेवढेच नितीन देसाई यांचे भव्य सेट्स, आखीव-रेखीव काम आणि नीता लुल्ला आणि मंडळींनी पोशाख व दागिन्यांवर घेतलेले कष्टही प्रसिद्ध झाले.. प्रत्यक्ष चित्रपट एवढा भव्य आणि छान बनला आहे, की ह्या सर्व मंडळींनी घेतलेली मेहेनत फळाला आली, असे मनोमन वाटते. आजच्या आपल्या पिढीला बालगन्धर्वांविषयी फारशी काहीच माहिती नाही.. फक्त येता-जाता वाचलेल्या काही गोष्टी वा कधीतरी पाहिलेले दुर्मिळ फोटो आणि ऐकलेले किस्से ह्यापलीकडे आपण कधी गेलो नाही.. पण, ती व्यक्ती काय होती, त्यांचे आयुष्य कसे खडतर होते, त्यांनी कलेची जोपासना व साधना कशी केली आणि हे सर्व करताना मूल्यांची जपणूक कशी केली, हे कुठे माहित होतं?? हे सर्व ज्ञात करून देणारा हा चित्रपट आजच्या पिढीसाठी  खूप मोठी  देणगी ठरला आहे.. समीक्षा करणारे करतच राहतात.. किंबहुना, अनेक व्यक्तींना कशालाच बरं म्हणवत नाही, त्यांना चुकाच पटकन दिसतात.. मला अशाप्रकारची मतं देणारे बरेच भेटले, "जमला नाहीये नीट.. बालगंधर्व हे काही ऐर्या- गैर्याचे काम नाही.. चित्रपट पकडच घेत नाही.." एक ना अनेक, ह्यापैकी काही गोष्टींमध्ये तथ्य असेलही कदाचित.. पण तरीही, ह्या चित्रपटाचे, 'एक अप्रतिम प्रयत्न!' म्हणून आपण कौतुकच केले पाहिजे..  एखादा पुरुष स्त्री-वेशातही इतका सुंदर दिसू शकतो, की स्त्रियांनाही त्या सौंदर्याचा हेवा वाटावा.. हे सुबोधने पुनश्च एकदा सिद्ध केले आहे.. बालगंधर्वांचे हरवलेले संगीत कौशल इनामदार व आनंदगंधर्व यांनी पुन्हा जीवंत केले आहे.. हे ही नसे थोडके.. मला तर बुवा चित्रपट फारच आवडला.. भामिनी, सुभद्रा, सिंधू यांच्या सौंदर्यामुळे, पेहेरावामुळे आणि सुमधुर गाण्यांमुळे मीही त्यांचा प्रेमात पडले आहे..!!

'ताऱ्यांचे बेट' हा देखील एक खूप चर्चा झालेला चित्रपट.. तोही खूप छान झाला असता, पण मूळ कथानक आणि पटकथा ह्यातच फारशी ताकद नसल्याने चित्रपट काही ठिकाणी गटांगळ्या खातो.. सचिन खेडेकर, अश्विनी गिरी ह्यासारखे कसलेले अभिनेते असल्याने त्यांनी मूळ कथानकातील कमी भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.. मुलाचे हट्ट पुरे करू न शकणाऱ्या एका अगतिक बापाची ही कथा आहे.. मुलाला एकदा ५-स्टार हॉटेल मध्ये नेऊन आणेन, असे वचन देणाऱ्या बापाला ५-स्टार चे २२,००० रुपये गोळा करण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात, आणि त्या खाऊनही शेवटी पदरात अपयशच कसं पडतं, एवढीच खरंतर ही कथा.. ती मांडताना शक्य तितकी रंजकता आणण्याचा कयास केला आहे.. काही ठिकाणी त्यात यश मिळतं, काही ठिकाणी नाही मिळत.. पण चित्रपटाचा एकत्रित प्रभाव पडायला हवा तसा पडत नाही.. तरीही, कोकणातील दापोली-आंजर्ला भागाचं नेत्रदीपक सौंदर्य, तेथील निरागस आयुष्य आणि ते जगणारी त्याहून निरागस माणसे, रोजच्या आयुष्यात त्यांना द्यावी लागणारी झुंज, हे सगळं मनात घर करून जातं, यात शंका नाही..

एकुणात काय.. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वेगळ्या धाटणीचे चित्रपट म्हणून ह्या चित्रपटांकडे पाहायला हवं.. पहिला चित्रपट एका असामान्य माणसाची असामान्य कहाणी सांगतो, तर दुसरा एका सामान्य माणसाची सामान्य कहाणी वर्णतो.. हे जरी खरं असलं, तरी दोन्ही चित्रपट हे वास्तवातेचे चित्रण करतात..!! आणि म्हणूनच, मनाला चटका लावून जातात..!! 

4 comments:

  1. wow!! mala tujha review khup awadla!! :) chaan lihites!

    ReplyDelete
  2. gr8 analysis and assessment...I am going to watch both of these films. I agree with you that since last 2-3 years Marathi films have got different subjects and they dare to experiment...I have watched almost all new movies (except comedy)..will continue doing it henceforth...

    ReplyDelete
  3. priyanka & amol
    thank you so much both of you.. marathi cinema is changing drastically and the change is certainly good.. we can expect some more nice movies in the future..
    well.. thanx for your appreciation and keep responding..

    ReplyDelete
  4. masta jhala ahe .... yess i saw both of them .. perfectly analysed... bal gandhava tar mastach ahe.. bal gandhava baghitly var marathi cinema haan eka next pedestal la pochlay asa saral kalun yeta.. aso... blog chaan jhalay .. ye dil maange more :)

    ReplyDelete