28 September 2012

कोमेजलेली फुले

गणेशोत्सव आला की सर्वत्र कार्यक्रमांचे वारे वाहू लागतात. गाण्यांच्या मैफिली, ऑर्केस्ट्रा, नाटके, मुलाखती.. कितीतरी कार्यक्रम मोठ्या हौसेने आयोजित केले जातात आणि तेवढ्याच उत्साहाने रसिक त्यांचा भरभरून आस्वाद घेतात. महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांना तर हीच पर्वणी असते मराठी कार्यक्रम पहायची. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत गणेशोत्सव धामधुमीत साजरा केला. ५ दिवस सलग कार्यक्रम होते.
ह्या ५ दिवसात सगळ्यात जास्त आकर्षण होते ते म्हणजे "सा रे ग म प- little champs" च्या गाण्याच्या कार्यक्रमाचे. गणेशोत्सवाचा 'climax ' म्हणून हा कार्यक्रम सगळ्यात शेवटी ठेवण्यात आला. ४ वर्षांपूर्वी झी 'सा रे ग म प' मधून घराघरात पोहोचलेली ही मुलं संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनली होती. मुग्धा, आर्या, रोहित, कार्तिकी आणि प्रथमेश ह्या मुलांनी आपल्या गोड आवाजाने आणि लाघवी वागण्याने सगळ्यांनाच आपलंसं केलेलं होतं .
ह्या मुलांना एवढ्या वर्षांनी परत पाहायला मिळणार, त्यांच्या सुमधुर आवाजात अनेक गाणी ऐकायला मिळणार ह्या विचाराने आम्ही अतिशय आनंदात होतो. प्रत्यक्षात कार्यक्रमही खूप छान झाला. मुळात आवाजाची नैसर्गिक देणगी, प्रत्येकाची गाण्याची एक खास style, वर्षानुवर्षे श्रोत्यांचे मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद, आणि अनुभवाने आलेला प्रचंड आत्मविश्वास.. ह्या सगळ्याच्या जोरावर ही मुले छान गायिली नाहीत, तरच नवल. एकाहून एक सदाबहार गीतं सादर झाली. अनेक गाण्यांना दिलखुलास once-more मिळाले. कार्यक्रम खूपच रंगला.
परंतु.. एक गोष्ट राहून राहून मनाला त्रास देत होती. ह्या मुलांचा आवाज आता पूर्वीप्रमाणे टवटवीत राहिलेला वाटला नाही. प्रत्येक सुंदर फुलाला कोमेजण्याचा शाप असतोच. पण ही सुंदर फुलं अकालीच का कोमेजू लागली, असा प्रश्न मनात डोकावू लागला.
'सा रे ग म प' च्या त्या पर्वापासूनच ही मुलं प्रसिद्धीच्या झोतात आली. सगळीकडे त्यांचा उदोउदो होऊ लागला. पर्व संपल्यानंतरही त्यांना अनेक कार्यक्रम मिळू लागले. त्या ५ जणांनी मिळून एकत्र अनेक कार्यक्रम केले. ठिकठिकाणी जाऊन गाण्याच्या मैफिली रंगवल्या. मात्र ह्या सगळ्या गडबडीत त्यांनी स्वताच्या रियाझाकडे कितपत लक्ष दिले ह्याबद्दल शंका वाटते. शिवाय कार्यक्रमातील गाण्यांची निवड देखील श्रोत्यांना पसंत पडावी अशी असल्याने मोठ्या आवाजातील, उडत्या चालीची गाणी ते अधिक म्हणतात. अति गायनामुळे निश्चितच स्वरयंत्रावर ताण पडत असणार. त्यामुळे आवाज खरखरीत होत जातो. तसा खरखरीतपणा ह्यापैकी काहींच्या आवाजात जाणवला. महाराष्ट्राची लाडकी असलेली ही मुले मोठी होईपर्यंत त्यांचे आवाज टिकवू शकतील की नाही अशी मला शंका वाटते.
संगीत (वा इतर कुठलीही कला) ही एक साधना आहे. अशा कार्यक्रमांमुळे अचानक प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो.. पण त्याला साधना मात्र म्हणता येत नाही. ही आणि अशा प्रकारची अनेक मुले उत्तम performer बनू शकतात. मात्र 'गायक' बनण्यासाठी हे पुरेसे नसते..!!!