17 May 2014

मोदींना महिलांचा पाठींबा का?श्री. नरेंद्र मोदी लवकरच भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधानपदाचा शपथविधी ही केवळ एक औपचारिकता आहे. ह्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. नरेंद्र मोदींना समाजातील सर्व घटकांतून निर्णायक पाठींबा मिळाला. युवकांनी ज्याप्रमाणे मोदींना उचलून धरले, त्याचप्रमाणे भारतीय महिलांनीही त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. महिलांना मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण का वाटले, याचे विश्लेषण मी ह्या लेखात करत आहे.

भारतीय महिलांविषयी नेहेमीच बोलले जाते की त्यांना राजकीय समज नाही. आपले पती सांगतील त्या उमेदवाराला त्या मत देतात. तसेच भारतीय महिला सोशिक असतात. सामाजिक समस्यांविरुद्ध आंदोलन करण्याऐवजी त्या समस्यांना अंगवळणी पाडून घेतात. येईल त्या परिस्थितीला शांतपणे तोंड देत राहतात. मात्र ह्या मताला ह्यापूर्वीही भारतीय महिलांनी अनेकदा खोटे ठरवले आहे. बदलाची आणि प्रगतीची आस धरणाऱ्या भारतीय महिला अनेकदा भारतीय राजकारणात निर्णायक ठरल्या आहेत. तसेच ह्यावेळी घडले.

मुळात महिलांचा राजकारणाशी खूप जवळचा संबंध असतो (कळत नकळत). त्यांचे रोजचे जीवन राजकारणाने प्रभावित होत असते. विजेचा तुटवडा, पाण्याचा अशुद्ध व अपुरा पुरवठा, अन्नधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किमती, शौचालयांची अनुपस्थिती, सांडपाण्याचा दोषपूर्ण निचरा ह्या महिलांना थेट भिडणाऱ्या समस्या आहेत. तसेच भारतातील मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था, माता आणि मुलांच्या आरोग्याची हेळसांड, आणि महिलांसाठी घातक रुढींचा पगडा, ह्यामुळे महिला त्रस्त असतात. अशा परिस्थितीत महिलांनी स्थानीय ते राष्ट्रीय राजकारणात वाढता सहभाग घेणे त्यांच्याच हिताचे आहे, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय महिला मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठी उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत. काँग्रेसची सर्वसामान्यांविषयीची धोरणे त्यांना आपलीशी वाटली. त्यातून आपला विकास होईल, असे त्यांना मनोमन वाटले. मात्र विकासाकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय महिलांना काँग्रेसने तो विकास बहाल केलाच नाही. अशा हताश परिस्थितीतच त्यांना मोदींच्या रूपाने एक आश्वस्त दिलासा मिळाला.

मोदींचे विनयशील तरीही आश्वासक व्यक्तिमत्व, त्यांची समाजमनाची समज, देशाविषयी निष्ठा आणि सुधारणेची तळमळ ह्यामुळे भारतीय महिला मुळातच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्या. तसेच मोदींनी केलेला गुजरातचा कायापालट घरा-घरात दूरदर्शन, वर्तमानपत्र यातून पोहोचला. गुजरातमधील २४ तास वीज, कछच्या रणातही पाण्याचा मुबलक पुरवठा, महिलांच्या शिक्षणातील प्रगती, स्त्रीभ्रूण हत्येचा नायनाट, आरोग्यविषयक सुधारणा ह्यामुळे जग अवाक झाले. त्याने भारतातील इतर भागात राहणाऱ्या महिलांच्या मनात आशेचा किरण चमकला. असेच सुखी, समाधानी जीवन आपल्याला हवे असे त्यांना न वाटते तरच नवल! मोदींच्या भाषणांमधून त्यांनी महिला समस्यांना वाचा फोडली. महिला आरोग्य, शिक्षण आणि जीवनस्तर ह्यावर भरपूर भाष्य केले. समस्यांनी पिचलेल्या महिलांना नवीन स्वप्ने दाखवली. ह्यामुळे महिलांचा पाठींबा मोदींकडे वळला.

महिलांच्या मोदी पाठिंब्याला अजून २ कारणे महत्त्वाची ठरली. एक म्हणजे, निवडणुकीत महिला उमेदवारांना खूप प्रोत्साहन दिले गेले. अगदी स्मृती इराणी, उमा भारतींपासून प्रथम उमेदवार मीनाक्षी लेखी, पूनम महाजन, हीना गावित पर्यंत सर्वांनी प्रचारात भाग घेतला. त्यांच्या चेहेऱ्यांतून महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब दिसले. दुसरे कारण म्हणजे, महिला सुरक्षेचा दिवसेंदिवस गंभीर झालेला प्रश्न. ह्या प्रश्नावर उपाय करण्यासाठी देशाला एका संवेदनशील तरीही सक्षम सरकारची गरज होती. ते दोन्ही गुण फक्त मोदींमध्येच दिसले.

काँग्रेसने मोदींची छबी मलिन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या भूतकाळातील विवाहाची चर्चा, जशोदाबेनविषयी खोटे गळे काढणे, महिलेच्या हेरखोरीची अतिरंजित कहाणी, आणि एकंदरच मोदींची 'पुरुषप्रधान' छबी रंगवण्याचा खूप प्रयत्न झाला. डाव्यांनी आणि तथाकथित 'मानवाधिकार' वाल्यांनी तर कहरच केला. पण भारतीय महिला कुठल्याच टीकेने विचलित झाल्या नाहीत. त्यांनी मोदींना पाठींबा देण्याचा निर्णय पूर्णत्वाला नेला. प्रसंगी पतीच्या, घरच्यांच्या सल्ल्यांना डावलून त्यांनी मोदींना भरभरून मतदान केले.

आपले जीवनमान उंचावेल ह्या भाबड्या आशेने भारतीय महिला मोदींच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांच्या आशेला भविष्यात मोदी कसे पूर्णत्वाला नेतात याविषयी आता उत्सुकता आहे.