22 August 2014

कबड्डी कबड्डी


मला स्पोर्ट्स पाहण्याची फारशी आवड नाही. आणि तसंही भारतात क्रिकेट शिवाय इतर खेळ फारसे पहिलेही जात नाहीत. क्रिकेट वर माझे फार प्रेम नाही (तसा फार रागही नाही).. कधीतरी वर्ल्ड कप वगैरे सुरु असेल तर एखादी मैच पाहते.. पण एरवी मी काही भारतीय 'क्रिकेट' धर्माची उपासक नाही.. लहानपणी टेनिसच्या मैच पहिल्या होत्या.. पण त्याही कधीतरीच.. थोडक्यात काय तर TVवर स्पोर्ट्स पाहण्याची वेळ विरळाच..

पण असं असतानाही मला सध्या एक नवीन छंद जडला आहे.. तो म्हणजे कबड्डीच्या मैच बघण्याचा.. त्याचं काय झालं.. गेल्या महिन्यात माझ्या एका भावाला घरी जेवायला बोलावलं होतं.. त्याने घरी आल्या आल्या स्टार गोल्ड लावायला सांगितलं.. पाहिलं तर 'प्रो-कबड्डी' नावाने कबड्डीचा खेळ मांडला होता (अगदी क्रिकेटच्या IPL सारखाच).. त्यादिवशी जयपूर आणि मुंबई या टीम्सची मैच होती.. आम्ही भावाबरोबर ती मैच एन्जॉय केली.. आणि त्या दिवसापासून तो रोज संध्याकाळचा कार्यक्रम झाला..

मी लहानपणी जे खेळ खूप आवडीने खेळले आहेत, त्यापैकी कबड्डी हा एक खेळ आहे (दुसरे म्हणजे लगोरी आणि खोखो).. या रोमांचक खेळाची आठवण आली तरी अंगावर काटा येतो.. दुसऱ्यावर आक्रमण केल्यावर जास्तीत जास्त जणांना बाद करून शिताफीनं परतायचं आणि दुसऱ्याने आपल्यावर आक्रमण केलं की काही करून त्याला पकडायचं.. यात वेगळीच मजा असते.. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच हा खेळ लहानपणी खेळलेला असतो.. मात्र काळाच्या ओघात त्याचा विसर पडत जातो..

मागे माझ्या पोलिटिक्स च्या सरांशी चर्चा करत होते.. की क्रिकेट आणि पारंपारिक भारतीय खेळ ह्यात काय फरक आहे.. ते म्हणाले, खोखो, कबड्डी, लगोरी ह्या भारतीय खेळांत सहखेळाडूंना स्पर्श करावा लागतो.. आणि त्यातून एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.. भारतीय माणूस हा मुळातच समाजशील आहे.. ह्याउलट ब्रिटीश लोक व्यक्तीस्वातंत्रवादी आहेत.. त्यामुळे त्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट सगळे एकमेकांपासून लांब उभे राहून खेळतात.. मजेशीर मुद्दा आहे.. पण पटण्यासारखा आहे.. ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण हे खेळ खेळलो आहोत, त्या बालसवंगड्याबद्दल एक वेगळाच जिव्हाळा आपल्या मनात असतो.. असो.. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने ह्या सगळ्या गतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला..

भारतात विविध खेळांत प्राविण्य मिळवलेले अनेक खेळाडू आहेत.. ज्यांची आपल्याला साधी नावंही माहित नसतात.. क्रिकेट खेळणाऱ्यांची मात्र गरजेपेक्षा जास्त माहिती आपल्याकडे असते (काही स्पोर्ट्स पेज आणि काही पेज ३ च्या माध्यमातून मिळालेली.. असो..).. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने अनेक कबड्डीपटूंशी ओळख झाली.. प्रत्येकाचे मूळ गाव कुठले येथपासून त्यांना कुठले पुरस्कार मिळाले आहेत, ह्याचीही माहिती झाली.. प्रत्येकाच्या विशेष खुबी कळल्या.. भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार राकेश कुमार कितीही जणांनी धरलं तरी जमिनीच्या आधाराने कसा निसटतो ते पाहिलं.. तसंच कितीही कठीण परिस्थिती असेल तरी संयमाने आणि शांतपणे गुण कमावणारा उप-कर्णधार अनुप कुमार पाहिला.. तसंच हिमाचलच्या अजय ठाकूरची वेगळीच आक्रमक शैली पहिली.. 

खूप खडतर परिस्थितीतून ही मंडळी पुढे आली आहेत.. भारताच्या संघात असून, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवूनही हे सगळे अतिशय साधे आणि विनयशील आहेत.. ह्याचे कौतुक वाटते.. ह्या व अशा प्रकाशझोतात न आलेल्या सगळ्यांनाच ह्या निमित्ताने सलाम करावासा वाटतो.. स्टार स्पोर्ट्सने ही अद्भुत दुनिया आपणां समोर आणली, हे बरेच झाले.. ह्या हरहुन्नरी खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास वाटतो..