27 November 2011

बदलणारे नातेसंबंध: एक चिंतन..


हल्ली अनेक ठिकाणी एक चर्चा ऐकू येते.. 'बदलत्या काळात भारतीय कुटुंब-व्यवस्था ढासळू लागली आहे'.. वर्तमानपत्रे, वाद-विवाद, चर्चासत्रे.. ह्यामध्ये हा विषय सध्या गाजतो आहे..
काल माझ्या बाबांनी मला एक लिंक forward केली.. ज्येष्ठ समाजसुधारक श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर यांचे दापोलीतील एका कार्यक्रमात केलेले भाषण होते ते.. विषय वरीलप्रमाणेच होता.. रात्री वाजेपर्यंत मी ते ऐकून संपवले.. भाषण संपेपर्यंत माझ्या मनात एकुणच सध्याच्या समाजाबद्दल उदासीनता निर्माण झाली..!!
श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या  मते, 'भारतीय कुटुंब-संस्थेचे गंडांतर अगदी नजीक येऊन ठेपले आहे.. आणि ह्या परिस्थितीत सुधारणा केली नाही.. तर आपली कुटुंब-व्यवस्था कायमची मोडून पडेल..'

मी समाज-व्यवस्थेचा जो थोडाफार अभ्यास केला आहे.. त्यावरून,, 'पाश्चिमात्य समाजाचा मुलभूत घटक 'व्यक्ती' असते.. मात्र पौव्रात्य समाजाचा मुलभूत घटक 'कुटुंब' असते..' आपल्या समाजात अनादी काळापासून कुटुंब-व्यवस्थेला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.. व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे 'कुटुंब-केंद्रित' असते.. ती आपले सर्व निर्णय कुटुंबाच्या साक्षीने (परवानगीने!) घेते.. स्वतःपुर्वी कुटुंबाचा विचार करते.. आणि कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःचे सुख त्यजायला तयार असते..
अर्थात.. ह्या कुटुंब-व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष ह्यांच्या स्वतंत्र भूमिका नेमून दिलेल्या होत्या.. पुरुष हा मुख्यत्वेकरून अर्थार्जन करीत असे.. स्त्री घरातील व्यवहार (स्वैपाक, पूजा-अर्चा, मुलांचे संगोपन, इत्यादी) सांभाळत असे.. हे असे कैक वर्षे चालत आले.. अगदी विनासायास..!!

मात्र गेल्या काही वर्षात हे कौटुंबिक "श्रम-विभाजन" बदलू लागले आहे.. स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या- शिक्षण घेऊ लागल्या.. विविध क्षेत्रात कार्य करू लागल्या.. अर्थार्जन करू लागल्या.. 'करियर' करू लागल्या.. परिणामतः, कुटुंब-व्यवस्थेला धक्का पोहोचणे साहजिकच होते.. स्त्रियांच्या बदलत्या भूमिका, त्यांचे दीर्घ काळ घराबाहेर राहणे, संसाराची- मुला-बाळांची हेळसांड.. हे सगळं घडणं हे ओघानेच आलं.. ह्या सगळ्या राम-रगाड्यात, सासू-सासऱ्यांच्या, नवऱ्याच्या, मुलांच्या, इतर नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्या कमी देखील पडू लागल्या.. मान्य.. सगळं मान्य..!!

पण, श्रीमती रामतीर्थकर यांनी आपल्या भाषणात ह्या परिस्थितीसाठी स्त्रियांना पूर्णपणे जबाबदार धरले आहे.. शिवाय, ह्या परिस्थितीला तोडगा म्हणून स्त्रियांना काही सल्लेही दिले आहेत.. त्यांच्या सर्व सल्ल्यांविषयी उहापोह करणे येथे शक्य नाही.. परंतु, त्यांच्या एकूण भाषणाचे सत्त्व 'बदलत्या काळामुळे स्त्रियांचा बदललेला दृष्टीकोन' हे आहे.. स्त्रियांचे शिक्षण, त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा, घरातील कामाविषयीची उदासीनता, नवऱ्याशी सासू-सासर्यांशी उर्मटपणे वागणे, त्यांचा आदर राखणे.. ह्या परिस्थितीकडे त्या आपले लक्ष वेधतात.. सरतेशेवटी कुटुंब वाचवण्यासाठी 'स्त्रीने पडतं घ्यावं ', 'पुरुषाने आपला कुटुंबावरील धाक पुनर्स्थापित करावा'.. असं त्या सांगतात..

मला त्यांचं भाषण खूप आवडलं.. परखड भाषा, नेमके विचार मांडण्याची हातोटी, आणि अस्खलित वाक्चातुर्य.. सर्व आहे.. समाजाविषयीची कळकळ आहे, त्याच्या उन्नतीचा ध्यास.. त्याच्या सुधारणेची आस आणि त्यासाठी अखंड प्रवास करण्याची तयारी आहे.. आजपर्यंत ८२० कुटुंब त्यांनी पडता-पडता वाचवली आहेत.. ह्याबद्दल मला त्यांचा अतिशय आदर वाटतो.. 'नातेसंबंध जपणे; त्यांना न्याय देणे', हेच व्यक्तीचे परम-कर्तव्य आहे.. हे त्यांचे मतही मला मनोमन पटते..

पण.. श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचा योग्य सन्मान करून..
माझ्या मनात आलेले काही विचार मांडत आहे..

) समाज हा गतिशील असतो.. ('प्रगतीशील' शब्द मुद्दामहून वापरत नाही.. कारण बदल हा नेहेमीच चांगलाच असतो, असे नाही!!!).. समाजात कालानुरूप बदल घडत असतात.. आणि हे बदल 'एकमार्गी' असतात.. अर्थात, एकदा झालेले बदल परत 'विपरीत' (reverse) होत नाहीत.. मग अशा परिस्थितीत समाज-सुधारणेसाठी 'प्रतिगामी' तोडगे कसे उपयोगी पडतील?? गेली ५० हून अधिक वर्षे घराबाहेर वावरलेल्या, शिकल्या-सवरलेल्या, 'करियरिस्ट' स्त्रिया.. आता अचानक घरात राहतील..??? स्वैपाक पाणी, मुलांचे संगोपन करण्यात समाधान मानतील?? नवऱ्यासमोर पडतं घेतील?? त्यांच्यावर त्यांच्या 'नवऱ्याचा धाक' पुनर्स्थापित होऊ शकेल?? मुळीच नाही..
एकदा बदललेला समाज परत मागे वळून पाहत नसतो.. हे शक्य नसतं आणि वांछनीय ही नसतं..

) कुटुंब-व्यवस्था टिकावी ह्यासाठी स्त्रीने पडतं घ्यावं (सासूने/ सुनेने/ भावजयीने/ नणंदेने.. कुणीही!!!.. पण स्त्रीने!!!) आणि पुरुषाने आपला धाक परत प्रस्थापित करावा.. असं त्या म्हणतात.. म्हणजे.. शतकानुशतकं जे चालत आलं.. तसंच परत व्हावं.. स्त्रियांनी पुरुषांना घाबरावं.. नवऱ्यासमोर 'आपल्याला काही कळत नाही' असं वागावं..
ह्या विचारांचा सरळसरळ अर्थ असा होतो.. "शतकानुशतकं जे चालत आलं, ते सर्व बरोबरच होतं.. त्यात बदलाची काहीच गरज नव्हती.. बदल अनाठायी झाला.." ह्यालाच 'status -quoist विचार' असं म्हटलं जातं.. पण समाजात कुठलाही बदल अनाठायी घडत नसतो.. प्रस्थापित संरचनेत काही त्रुटी असतात.. म्हणूनच समाज बदलाकडे सरकत असतो..
एवढ्या वर्षांची व्यवस्था जाचक होती, अन्याय्य होती.. असं १९व्या शतकातील समाजसुधारकांच मत झालं.. त्यामुळेच त्यांनी बदलांची आस धरली..

थोडक्यात.. बदल झाले आहेत.. आणि आता ते पुसून टाकता येणार नाहीत.. सामाजिक बदलांमध्ये 'U -turn ' घेता येणं शक्य नाही.. आणि तसा तो घेणं योग्यही नाही..  

) आता मी माझ्या तिसऱ्या.. आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येते.. आपल्याला कुटुंब-व्यवस्था  टिकवायची आहे.. समाज सुधारायचा आहे..
पण ह्या सुधारणे मागचा दृष्टीकोन थोडा वेगळा असेल तर???
म्हणजे.. बदललेल्या परिस्थितीत.., मुली शिकतात.. 'करियर' करतात.. त्यांची लग्न उशिरा होतात.. लग्नापूर्वी त्यांची स्वतःची अशी एक ओळख समाजात निर्माण झालेली असते.. त्यामुळे लग्नानंतर सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना जड जाते.. हे सगळे बदल आपण 'दिलेल्या गोष्टी' म्हणून स्वीकारले.. तर??? तसेही आता ह्यात फेर-बदल होणे अशक्यच आहे ना??? (आपल्यापैकी काहींची कितीही इच्छा असेल तरीही..!!!).. मग बदलांचा स्विकार का करू नये???
ह्या बदलांमुळे जुन्या कुटुंब-व्यवस्थेला धक्का बसला आहे.. हे देखील मान्य करूया..

पण, हे सगळे 'व्यवस्थेतील बदल' (अर्थात.. 'systemic problems '..) आहेत.. त्यांचे खापर केवळ स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर फोडता.. स्त्रियांकडून (परत) आज्ञाधारकपणाची ( पुरुषांकडून धाकाची!!!) अपेक्षा करता.. हे प्रश्न सोडवता येणार नाहीत का..??? स्त्रियांच्या बदलत्या भूमिकेबरोबर कुटुंबातील इतर घटकांनीही आपल्या भूमिकांचा फेरविचार करायला हवा असं वाटत नाही का???
'सासूने सुनेकडे मुलीप्रमाणे पाहावे, सुनेने सासूकडे आईप्रमाणे..' असे जर आपण म्हणतो.. तर हा कौटुंबिक भूमिकांचा फेरविचारच नाही का?? नवऱ्याने बायकोला घरकामात मुलांच्या संगोपनात साथ दिली (केवळ धाक दाखवत बसता) तर काही बिघडले का??? मुलाच्या आईप्रमाणेच मुलीच्या आईने लेकरांच्या संसारात काही सल्ले दिले (आपल्या भाषेत 'ढवळाढवळ केली') तर त्यात कुणाला एवढा राग येण्यासारखे काय झाले??
अर्थात, ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये सुनांच्या बेदरकार वागण्याचे समर्थन करणे.. हे मुळीच अपेक्षित नाही.. सासू-सासऱ्यांना आई-वडिलाप्रमाणे वागावण्यामध्ये त्यांच्या उतारवयात त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे.. त्यांचे मायेने संगोपन करणे.. हे ओघाने आलेच..

'व्यवस्थेतील बदल' हा सर्व घटकांच्या सहाय्याने घडत असतो.. त्याला सर्व घटक सारखेच जबाबदार असतात.. त्याचे परिणामही सर्व घटकांवर सारखेच होत असतात.. त्यामुळे त्यासाठी स्त्रियांनाच पूर्णपणे जबाबदार मानून.. त्यांच्याकडूनच तडजोडीची अपेक्षा करून.. ढासळणारी कुटुंब-व्यवस्था तरणार नाही.. उलट, घटस्फोटांचे प्रमाण अधिक वाढत जाईल.. आणि कुटुंब-संस्था पुरती मोडून पडेल..

त्यामुळे कुटुंबातील सर्व घटकांनी बदलाचा स्विकार ( आदरही!!!) करून त्याप्रमाणे आपल्या भूमिकांचाही फेरविचार करावा.. हेच खऱ्या अर्थाने 'नातेसंबंधांना न्याय देणे' होईल..

(ता. . माझ्याकडे श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर यांचे हे संपूर्ण भाषण आहे.)