सध्या आपला समाज एका विचित्र परिस्थितीतून वाट काढत आहे. हल्लीच्या वृत्तपत्रांचे मजकूर वाचले, वा काही काळ वृत्तवाहिनी समोर बसले की मन उदासीन होऊन जाते. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात घेऊनच जनतेसमोर अभिमानाने उभे राहणारे नेते आणि आपल्याच नाकर्तेपणावर निर्लज्जपणे पांघरून घालणारे राजकारणी व प्रशासक पाहिल्यावर शिसारी येते. एकमेकांवर चिखलफेक करण्यात ह्यांचे हात कुणीच धरू शकत नाहीत. ह्याशिवाय, जागोजागी-क्षणोक्षणी होत असलेले बलात्कार, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलांवर होणारे अतिप्रसंग, हे सर्व वाचून मनाची अगदी लाही लाही होते.
अशा बिकट परिस्थितीत भारताला दिशा दाखवण्याची मोठी जबाबदारी जाते ती समकालीन वरिष्ठ नेते, वैज्ञानिक, धर्मगुरू, आणि चरित्र नायक ह्यांच्याकडे. मात्र आजमितीला असे 'युग-पुरुष' हाताच्या बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. मग ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करणारे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम असोत, भ्रष्टाचाराविरुद्ध जिद्दीने लढणारे श्री अण्णा हजारे असोत, आपल्या निर्भय लेखणीने अयोग्याची कानउघाडणी व योग्याची प्रशंसा करणारे गिरीश कुबेरांसारखे पत्रकार असोत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात स्वतःचा खारीचा वाटा उचलणारे अभिनेते श्री विक्रम गोखले ह्यांचे कार्यदेखील कमी मोलाचे नाही. मात्र हे किरकोळ अपवाद वगळता इतरत्र 'आनंद'च दिसतो.

गुजरात राज्यातील विकास प्रकल्पांची जाहिरात केल्याबद्दल त्यांनी अभिनेते श्री अमिताभ बच्चन ह्यांच्यावर शरसंधान केले अहे. अमिताभचे हे वागणे 'संतापजनक' असल्याची टीका त्यांनी केली आहे. (काही वर्षांपूर्वी माननीय नाटककार श्री विजय तेंडूलकर ह्यांनी देखील 'नरेंद्र मोदींना गोळी घालेन' असे भ्याड, बिनबुडाचे विधान केले होते. गिरीश कर्नाड हे देखील त्यांचेच मित्र!), अशाप्रकारचे विधान करताना कर्नाडांनी 'लोकशाही' व 'भाषण स्वतंत्र' ह्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. मात्र ह्याच 'लोकशाही' पद्धतीने बहुमताने निवडून आलेले गुजरात सरकार मात्र त्यांच्यासाठी टीकेस पात्र आहे. एखाद्या राज्यात एक पुढारी प्रचंड बहुमताने तीनतीन वेळा निवडून येतो, आणि तरीही आपल्या सारखे तथाकथित 'बुद्धीजीवी'आणि 'लोकशाहीचे स्तुतिपाठक' त्याची निष्कारण अवहेलना करण्यात मागेपुढे पाहत नाहीत, ह्याचा अर्थ काय ?
तसेच, 'बाबरी मशीद प्रकरणातून झुंडशाहीला राजमान्यता' असेही एक विचित्र विधान केले आहे. बाबरी मशीद प्रकरणाला झुंडशाही म्हणेपर्यंत ठीक आहे. पण त्याचा १९९६ आणि १९९८ मध्ये भा.ज.प. च्या सत्तेवर येण्याशी संबंध लावणे हे कुणाही विचारी माणसास न पटणारे आहे. 'बाबरी मशीद पडणारेच सत्तेवर आले' असे म्हणताना कर्नाडांनी भारतीय मतदारांचा घोर अपमान केलेला आहे. असे सरकार जर 'बाबरी मशीद पडणारे' होते, तर प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेच कसे? भा.ज.प. सरकारने १९९८ नंतर आपला कार्यकाल पूर्ण करून अनेक लोकोपयोगी कामे केली. अशा सरकारला व त्यातील नेत्यांना 'बाबरी मशीद पडणारे' म्हणण्याचा मूढपणा कर्नाडांनी केला आहे.
असो. ही व अशी मुक्ताफळं अजून २-३ दिवस लोकसत्ता मधून छापून येत राहतील. कारण पेपरवाले काय किंवा channel वाले काय, त्यांना फक्त 'TRP' दिसत असतो. त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा! त्यांच्याबद्दल तर न बोलणेच अधिक युक्त.
ह्या लेखाचे मुख्य लक्ष आहे, ते म्हणजे अशाप्रकारे मुक्ताफळं उधळणारे.. वरीलप्रमाणे वक्तव्य करणारे गिरीश कर्नाड, आपल्या ब्लॉगवर आपल्याच पक्षाबद्दल उलटसुलट लिहिणारे लालकृष्ण अडवाणी, बिनबुडाचे दिग्विजय सिंघ, सामान्य जनतेला 'गुराढोरांचा वर्ग' म्हणणारे शशी थरूर, आणि 'मुलींच्या चुकीमुळेच बलात्कार होतात' असे म्हणणारे आसाराम बापूं, सगळे एकाच माळेचे मणी! ह्यांच्या अशा मुक्ताफळांमुळे भारतीय जनतेची दिशाभूल होतेय, हे ह्यांच्या कधी लक्षात येणार???